गोल्डप्लेटेड बिर्याणीचा स्वाद चाखायला चला दुबईला

खाद्यसंस्कृती मध्ये बिर्याणी या पदार्थाचे स्थान फार वरचे आहे. बिर्याणी प्रेमींची संख्या आकड्यात सांगणे अवघड. त्यामुळे बिर्याणीचा कोणताही नवा अवतार आला की त्याची चव चाखण्यास खवय्ये नेहमीच उत्सुक असतात. दुबईतील बॉम्बे बोरो नावाच्या एका प्रसिद्ध भारतीय हॉटेलने चक्क गोल्ड प्लेटेड बिर्याणी पेश केली आहे. गोल्ड प्लेटेड बांगड्या, घड्याळे, अंगठ्या अगदी गाड्या याबद्दल आपण अनेकदा ऐकतो पण गोल्ड प्लेटेड बिर्याणी हा नक्कीच नवा प्रकार आहे.

अर्थात रॉयल गोल्ड बिर्याणी नावाने प्रसिद्ध असलेल्या या बिर्याणीची किंमत सुद्धा नावाला साजेल अशीच आहे. ही बिर्याणी १ हजार दिरहाम म्हणजे २० हजार रुपयात एक प्लेट अशी विकली जाते. ३ किलो तांदूळ, मटन चॉप, मीट बॉल, ग्रील्ड चिकन, अनेक प्रकारचे कबाब अशी तिची सजावट असते. या बिर्याणी साठी सिम्पल चिकन बिर्याणी तांदूळ, खिमा बिर्याणी तांदूळ आणि पांढरा केशरयुक्त बिर्याणी तांदूळ असे तांदूळ वापरले जातात. कॅरेमल केलेल्या भाज्या ही असतात. एका प्लेट मध्ये पूर्ण परिवाराचे पोटभर जेवण होऊ शकते.

ग्राहकाला सर्व्ह करण्यापूर्वी ही बिर्याणी २३ कॅरेट सोन्याच्या पानात लपेटून दिली जाते.