तिसऱ्या टप्प्यातील अहवालातून भारत बायोटेकची लस 81 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट


हैदराबाद: भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन ही लस 81 टक्के प्रभावी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. आपल्या कोरोनाच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याचा अहवाल भारत बायोटेकने उघड केला आहे.

ही लस आता कोरोनावर 81 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या अभ्यासासाठी एकूण 25,800 लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यावेळी ही लस घेतलेल्या लोकांमध्ये कोणताही दुष्परिणाम दिसून आला नसल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस ही 62 टक्के, फायझर-बायोएनटेकची लस 95 टक्के आणि मॉडर्नाची लस ही 94 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या कंपनीने त्यांची लस ही 66 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले होते.

भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्यावतीने कोव्हॅक्सिन ही लस संयुक्तपणे विकसित केली जात आहे. याच्या आपत्कालीन वापरासाठी या आधीच परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्याचा पुनरावलोकन डेटा ‘द लॅन्सेट’ या सायन्स नियतकालिकेत प्रसिध्द करण्यात आला होता. भारत बायोटेक ही अशा प्रकारचा डेटा प्रकाशित करणारी भारतातील पहिलीच कोरोना लस निर्मिती करणारी कंपनी आहे. आयसीएमआरनेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

भारत बायोटेकच्या पहिल्या टप्प्यामध्ये या लसीचा 375 लोकांवर वापर करण्यात आला होता. त्यासंबंधीचा डेटा लॅन्सेटकडे जमा करण्यात आला होता. आता तो पहिल्या टप्प्याचा डेटा लॅन्सेट या नियतकालिकेत प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आलं आहे की कोव्हॅक्सिन लसीमुळे मानवी शरीरातील अॅन्टीबॉडी या क्रियाशील होतात, तसेच शरीरामधील टी-सेल याही क्रियाशील होतात. अॅन्टीबॉडी हे एक प्रकारचे प्रोटिन्स असतात, जे मानवी शरीरातील व्हायरसविरोधात तयार होतात आणि त्या विरोधात लढतात. टी-सेल या कोणत्याही रोगाविरोधात लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीची निर्मिती करण्यासाठी अत्यावश्यक असतात.