देशातील सर्वात मोठ्या रोबोट फॅक्टरीची नोएडात सुरुवात


नोएडा: येत्या काही वर्षात रोबोचा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. आगामी काळ हा रोबोटिक्सचा काळ असल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी रोबोची निर्मिती देशात करणे हे क्रांतीचे लक्षण असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठ्या रोबोट फॅक्टरीची सुरुवात नोएडा या शहरात करण्यात आली आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी बुधवारी या रोबोट फॅक्टरीचे उद्धाटन केलं आहे.

साहित्यावरील कोडचे स्कॅन या कंपनीत तयार करण्यात येणारे रोबोट हे करु शकतात. त्या स्कॅनवरुन साहित्य कोणत्या पत्त्यावर पाठवायचे आहे, ती माहिती देते. एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे. 25 किलो ते 2 टनापर्यंतचे वजन हा रोबोट एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकतात. या रोबोटमध्ये यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

नीती आयोग येत्या काही काळात देशात तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त वापर करावा यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे या अशा प्रकारच्या वर्ल्ड क्लॉस फॅक्टरीच्या निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे नोएडात देशातील सर्वात मोठी रोबोट तयार करणारी एडवर्ब नावाची कंपनी उभी राहत आहे.

नीती आयोगाचे अमिताभ कांत म्हणाले की, जलद तंत्रज्ञानाच्या विकासाची देशात आवश्यकता आहे. रोबोटिक्स आणि जीनोम सिक्वेन्सिंगची यामध्ये गरज आहे. अशा कंपन्यांच्या विकासाला त्यामुळे प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतात सध्या अनेक कंपन्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमांच्या अंतर्गत भारतात तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.