पोलार्डची युवराजच्या विक्रमाशी बरोबरी; एकाच षटकात ठोकले सहा षटकार


वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरु असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने सहज विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या संघाने ४१ चेंडू आणि चार गडी राखत सामना खिशात घातला. इंडिजकडून कायरन पोलार्डने कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. अकीला धनंजयच्या एक षटकामध्ये पोलार्डने सहा षटकार लगावले. या पराक्रमबरोबरच पोलार्डने युवराज सिंग, हर्शल गिब्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. युवराजने टी-२० विश्वचषक स्पर्धेत तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

विंडीज संघाची फलंदाजी सुरु असतानाच पोलार्डने पाचव्या षटकामध्येच हा पराक्रम करत विक्रमी कामगिरी केली. ११ चेंडूमध्ये पोलार्डने ३८ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-२० मधील विक्रमाची बरोबर केली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबर करण्यात यश मिळाले आहे.

पोलार्डच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मैदानामध्ये फलंदाजीसाठी पोलार्ड उतरला, तेव्हा वेस्ट इंडिजचे चार फलंदाज तंबूत परतले होते. लेंडल सिमन्स २६ धावा, एविन लुईस २८ धावा यांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर ख्रिस गेल आणि निकोलस पूरन भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर पोलार्डने वेस्ट इंडिज संघाच्या विजय मिळवून देत तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिली सामना जिंकला.

सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याची कामगिरी करत पोलार्डने क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तिसरा खेळाडू होण्याचा विक्रम आपल्या स्वत:च्या नावे केले आहे. यापूर्वी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने २००७ च्या आयसीसीच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकामध्ये सलग सहा षटकार लगावले होते. युवराजच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा नावजलेला फलंदाज हर्षल गिब्सने त्याच वर्षी म्हणजेच २००७ साली एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. नेदरलॅण्डविरोधातील सामन्यामध्ये गिब्सने डान वॅन बुंगेच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सहा षटकार लगावले होते. सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावणारा पोलार्ड हा पहिलाच वेस्ट इंडियन खेळाडू ठरला आहे.

श्रीलंकेने या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा करत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. वेस्ट इंडिजच्या संघाने १३.१ षटकांमध्येच सहा गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करत सामना चार गाडी राखून जिंकला. या मालिकेतील पुढचा सामना ६ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.