‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल; आता भारतामध्ये करता येत नाही मुक्तपणे मतप्रदर्शन


नवी दिल्ली – स्वातंत्र्यासंदर्भात भारताच्या मानांकनामध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने कपात केली आहे. भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र वरुन अंशत: स्वतंत्रवर आणण्यात आला आहे. फ्रीडम हाऊसने आपल्या अहवालात नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य हे २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचे म्हटले आहे. खास करुन भारतातील मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने करोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यावर गदा आल्याचे फ्रीडम हाऊसने नमूद केले आहे.

भारताला स्वातंत्र्याच्या बाबतीत देण्यात आलेले गुण हे ७१ वरुन कमी करुन ६७ करण्यात आले आहेत. भारताचा जगातील २११ देशांमध्ये क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे. फ्रीडम हाऊसने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये, मानवी हक्कासांठी लढणाऱ्या संस्थावर मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जाणकार आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचाही समावेश आहे. मोदी स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखीन घसरण झाली. त्यानंतर २०२० साली ज्या पद्धतीने भारत सरकारने कोरोनाची परिस्थिती हाताळली त्यादरम्यान मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतातील परिस्थितीसंदर्भात फ्रिडम हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये भाष्य केले आहे. देशातील हिंदू राष्ट्रवादी सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वाढत्या हिंसेच्या पार्शभूमीवर समर्थन करण्यात आले. तसेच मुस्लिम लोकसंख्येला बाधा पोहचवणाऱ्या विषमता निर्माण करणारे धोरणे लागू करण्यात आली. तसेच प्रसारमाध्यमे, वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ, नागरिक हक्कांसाठी लढणारे गट आणि आंदोलकांचे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे फ्रिडम हाऊसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आता स्वातंत्र्याच्या बाबतीत इक्वाडोअर आणि डॉमनिक रिपब्लिकच्या बरोबरीने ६७ गुण मिळाल्यामुळे भारत आहे. भारतामधील स्वातंत्र्याच्या दर्जा हा, ‘पूर्ण स्वतंत्र’ वरुन ‘अंशत: स्वतंत्र’वर आणला आहे. भारताचे मानांकन घटल्यामुळे, याचा अर्थ देशातील २० टक्क्यांहून कमी लोकसंख्या सध्या स्वतंत्र देशांमध्ये राहते. हा आकडा १९९५ नंतरचा सर्वात कमी आकडा असल्याचे फ्रिडम हाऊसने म्हटले आहे.

जगामध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून फिनलॅण्ड, नॉर्वे, स्वीडन हे पहिल्या स्थानी आहेत. तर सर्वात कमी स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये तिबेट आणि सिरियाचा समावेश आहे. मागील वर्षभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारांनी विरोधकांवर कारवाया केल्या. तसेच करोनाला सरकारने दिलेल्या प्रतिसादामध्ये अचानक लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे कोट्यावधी स्थलांतरित मजुरांना अनियोजित पद्धतीने स्थलांतर करावे लागले. सत्ताधारी हिंदुत्वादी मोहिमेने मुस्लिमांविरोधातही काम केले.

त्यांना कोरोना विषाणूच्या प्रसारासासाठी दोषी ठरवण्यात आले, तसेच ते झुंडबळीचेही शिकार ठरले. लोकशाही देशातील सरकार म्हणून चीनसारख्या देशातील एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठवण्याऐवजी मोदी आणि त्यांच्या पक्षाने भारतालाच एकाधिकारशाहीच्या दिशेने ढकलल्याचे फ्रिडम हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे.