व्हॉट्सअॅपवेब वरुनही आता करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग


आपल्या युजर्ससाठी लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅपकडून सातत्याने नवनवे फिचर्स आणले जात असतात. त्यातच आता अजून एक नवीन फिचर कंपनीने आणले असून याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुनही (डेस्कटॉप व्हर्जन) ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगची सेवा मिळेल.

या फिचरची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती, आता कंपनीने अखेर हे फिचर रोलआउट करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. बीटा युजर्ससाठी व्हिडिओ/ऑडिओ कॉलिंगच्या फिचरवर व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये अनेक दिवसांपासून चाचणी सुरू होती. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, हे फिचर आता कंपनीने सामान्य युजर्ससाठीही रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप वेब/डेस्कटॉप व्हर्जन 2.2104.10 मध्ये रोलआउट केले जात आहे.

या फिचरनुसार, व्हॉट्सअॅपवेबमध्ये कॉल आल्यानंतर एक नवीन विंडो पॉप अप होईल, तिथून युजर्स कॉल स्वीकारू किंवा नाकारु शकतात. व्हॉट्सअॅपवेबवरुन अशाचप्रकारे कॉलिंग करण्यासाठीही एक पॉप अप मिळेल, तिथे कॉलिंगसाठी पर्याय दिलेला असेल. अन्य व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मप्रमाणे यामध्येही युजर्सना व्हिडिओ ऑफ, व्हॉइस म्यूट आणि रिजेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. व्हॉट्सअॅपवेब मध्ये कॉलिंगदरम्यान युजर्स मुख्य व्हॉट्सअ‍ॅप इंटरफेसवरही चॅटिंग करु शकतात, कारण येथे कॉलिंगसाठी वेगळी पॉप-अप विंडो ओपन होते.