भाजपचा एक खासदार शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ याच महिन्यात देणार राजीनामा – राकेश टिकैत


नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या राकेश टिकैत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. याच महिन्यात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक भाजप खासदार राजीनामा देणार असल्याचा दावा राकेश टिकैत यांनी दावा केला आहे. पण त्या खासदाराचे नाव त्यांनी उघड केलेले नाही.

देशभरातील राजकीय वर्तुळात राकेश टिकैत यांनी केलेल्या या दाव्या नंतर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत, तसेच, तो भाजप खासदार कोण असेल? कुठला असेल याबाबत देखील अंदाज लावले जात आहेत. तर, पश्चिमी उत्तर प्रदेश किंवा हरियाणा येथील तो खासदार असल्याचीही शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

तत्पूर्वी मुजफ्फरनगरच्या मीरापुर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अवतार सिंह भडाना यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी कृषी कायद्याविरोधातच राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. याच महिन्यात राकेश टिकैत पाच राज्यांचा दौरा करणार आहेत. किसान यूनियनचे माध्यम प्रभारी धर्मेंद्र मलिक यांनी सांगितले आहे की, राकैश टिकैत मार्चममध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि तेलंगणचा दौरा करतील व शेतकरी आंदोलनासाठी अनेकांचे समर्थन मिळवतील.