सोनू सूद आता नवीन मदतीसाठी सरसावला

लॉक डाऊन काळात प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी परतण्यासाठी मोलाची मदत करून चर्चेत आलेला बॉलीवूड अभिनेता सोनू सूद आता सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. त्याने ‘सोनू सूद फॉर यु’ नावाने ब्लड बँक अॅप देशभरात लाँच केले असून या अॅपच्या माध्यमातून तो रक्तपेढीचे संचालन करणार आहे.

सुरु होण्यापूर्वीच ही देशातील सर्वात मोठी रक्तपेढी असल्याचा दावा केला जात आहे. या अॅपचा उद्देश ज्या रुग्णांना रक्ताची तातडीने गरज आहे त्यांना राक्तदात्याशी जोडणे हा आहे. या अॅपच्या मदतीने गरजवंत रक्तदाता शोधू शकेल आणि त्याला रक्त देण्यची विनंती करू शकेल. मग रक्तदाता हॉस्पिटल मध्ये रक्तदान करू शकेल. सोनू आणि त्याचा मित्र जॉन्सन यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो कृतीत आणला आहे.

अनेकदा रुग्णाला त्वरित रक्त मिळणे आवश्यक असते, सोशल मिडियावर या प्रकारच्या विनंत्या अनेकदा पाहायला मिळतात. पण प्रतिसाद मिळेपर्यंत महत्वाचा वेळ निघून जातो. अॅप मुळे ही मदत अधिक वेगाने मिळविणे शक्य होणार आहे. विशेष रक्तगट किंवा दुर्मिळ रक्तगट असेल तर त्याचा रक्तपेढीत शोध घेण्यात वेळ खर्च होतो. देशात वर्षाला १२ हजार व्यक्ती वेळेवर रक्त मिळाले नाही या कारणाने प्राणाला मुकतात. सोनूच्या सोनू फॉर यु मुळे अॅपच्या सहाय्याने २० मिनिटात रक्त उपलब्ध होऊ शकणार आहे असे समजते.