व्होल्वो २०३० पासून विकणार फक्त इलेक्ट्रिक कार्स

जगभरातील सर्व कार उत्पादक कंपन्या शून्य उत्सर्जन मॉडेल साठी स्पर्धेत हिरीरीने सामील होत असल्याचे दिसून येत असतानाच व्होल्वोनेही २०३० पासून फक्त इलेक्ट्रिक कार्स विक्री करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या इलेक्ट्रिक कार्स ऑनलाईन विक्री केल्या जाणार आहेत. याचाच दुसरा अर्थ व्होल्वो पेट्रोल, डिझेल आणि हायब्रीड कार्स फेज आउट करण्याच्या प्रयत्नात आहे. अर्थात टप्प्या टप्प्याने हे काम केले जाईल असे संकेत दिले गेले आहेत.

कंपनीचे चीफ एग्झीक्युटीव्ह हाकन सॅम्युअल म्हणाले भविष्यात इलेक्ट्रिक कार्सना ग्राहकांची जबरदस्त मागणी असेल. काही वर्षांनी ग्राहक पेट्रोल, डिझेल कार्स खरेदी करणार नाही. त्यामुळेच कंपनीने २०३० पासून सर्व मॉडेल्स इलेक्ट्रिक रुपात बाजारात आणण्याची तयारी केली आहे. या साखळीतील पहिले मॉडेल, सी ४० फुल इलेक्ट्रिक एसयूव्ही मंगळवारी बाजारात सादर करण्यात आले आहे. ही कार फुल चार्ज मध्ये ४२० किमी अंतर कापेल आणि तिला वायरलेस अपग्रेड दिले जाणार आहे असेही जाहीर केले गेले आहे.