मेगन मर्केलचे हिऱ्याचे झुमके विवादात

हॉलीवूड अभिनेत्री आणि ब्रिटीश राजघराण्याचा प्रिन्स हॅरी याची पत्नी मेगन मर्केल हिने एका समारंभात घातलेले हिऱ्याचे झुमके विवादाच्या भोवऱ्यात आले असून त्यासाठी मेगन हिच्या वकिलांना सफाई द्यावी लागली आहे. अर्थात हे झुमके त्याची किंमत किंवा सुंदरतेमुळे चर्चेत आलेले नाहीत तर ज्या व्यक्तीकडून मेगनला ते गिफ्ट म्हणून दिले गेले त्या व्यक्तीमुळे वादात सापडले आहेत.

हे झुमके सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी मेगनला गिफ्ट केल्याचे सांगितले जात आहे. प्रिन्स मोह्म्मद यांच्यावर पत्रकार जमाल खगोशी यांच्या हत्येस जबाबदार असल्याचा आरोप असून अमेरिकेतील जो बायडन सरकारने गुप्तचर अहवालात प्रिन्स मोहम्मद यांचे  नाव पुढे आल्यावर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या हिरे झुमक्यांची किंमत ५ कोटी असून मेगन हिने ग्रांड पॅसिफिक हॉटेल मध्ये एका डिनर कार्यक्रमात घातले होते. पुन्हा एकदा प्रिन्स चार्ल्स यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या वेळीही मेगनच्या कानात हे झुमके होते. डिनर कार्यक्रमापूर्वी तीन आठवडे जमाल खगोशी यांची इंस्तंबुल येथील सौदी दुतावासात हत्या झाली होती. मिडिया रिपोर्टनुसार आणि मेगनच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार हे झुमके प्रिन्स मोहम्मद यांच्याकडून गिफ्ट आल्याची कल्पना मेगनला नव्हती. कारण प्रिन्स मोहम्मद आणि मेगन यांची प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती.

१८ ऑक्टोबर रोजी केंसिग्टन पॅलेस फिजी मध्ये एका डिनरच्या वेळी मेगन हिला हे झुमके गिफ्ट केले गेले होते असे समजते. मात्र त्यावेळी मेगन हिला कुणी गिफ्ट दिले त्यांचे नाव सांगितले गेले नव्हते असे तिच्या वकिलांचे म्हणणे आहे.