ही आहे जगातील सर्वात मंद धावणारी एक्सप्रेस ट्रेन

आज जगभरात वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सुपर ट्रेन, बुलेट ट्रेनची चर्चा होत असली तरी जगात सर्वात मंद वेगाने धावणारी एक एक्सप्रेस आजही धावते आहे. ही ट्रेन अक्षरशः सायकलच्या वेगाने जाते मात्र तिच्यातून प्रवास करण्यास अनेक प्रवासी खूप उत्सुक असतात. करण ही ट्रेन धावते निर्सगसुंदर स्वित्झर्लंड देशात. या ट्रेनचे नाव ग्लेशियर एक्सप्रेस असे आहे. नावाप्रमाणेच ती स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित पर्वत रांगांतून आतील प्रवाशांना निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन घडवीत अतिशय संथ वेगाने जाते.

रमार्ट आणि सेंट मोरीटेज स्टेशन दरम्यानचे २९० किमी अंतर असा तिचा मार्ग आहे. हे अंतर कापण्यास या ट्रेनला तब्बल १० तास लागतात. म्हणजे ताशी २९ किमीच्या वेगाने ती मार्गक्रमणा करते. १९३० साली ही ट्रेन सुरु झाली त्यावेळी हा प्रवास खडतर होता कारण प्रवाशांना कोणत्याच सुविधा नव्हत्या. आता मात्र खुपच सुधारणा केल्या गेल्या असून पर्यटक मुद्दाम या ट्रेन प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी येतात. या मार्गावर ९१ बोगदे आणि २९१ पूल ही ट्रेन पार करते.

उंच पहाड आणि दऱ्या मधून जाताना प्रवाशांना चढण सुरु झाली की खास प्रकारची वाईन दिली जाते. यामुळे पोटात दुखणे किंवा मळमळ होणे, उलटी होणे असे त्रास होत नाहीत असे समजते. हा सर्व प्रवास मार्ग अतिशय रोमांचक आहे असा अनुभव प्रवासी सांगतात.