चंद्र सफरीसाठी हा जपानी अब्जाधीश शोधतोय सहप्रवासी
चंद्रावर जाण्यासाठी जपानी अब्जाधीश यासुका मिजावा स्वतः अतिशय उत्सुक आहेच पण स्वतः बरोबर नेण्यासाठी तो आणखी आठ प्रवाशांचा शोध घेतो आहे. ही खासगी ट्रीप असून एलन मस्क यांच्या स्पेस एक्स तर्फे ही चंद्र वारी केली जाणार आहे. यासुका २०२३ मध्ये आठवड्यासाठी चंद्र सफरीवर जाणार असून प्रथम त्यांनी कलाकारांना सोबत नेण्याचा विचार केला होता. मात्र आता त्यांनी जगभरातील लोकांना या सफरीमध्ये सामील करून घेण्याचा विचार केला असून त्यासाठी सहप्रवाशाचा शोध घेतला जात आहे.
यासाठीची निवड प्रक्रिया १४ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. त्यात इच्छुकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून जे फिट असतील त्यांची मुलाखत यासुका घेणार आहेत. स्टार शिपचा पूर्ण खर्च यासुका करणार आहे. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये अंतराळवीरांना फाल्कन ९ रॉकेटच्या सहाय्याने अंतराळ स्टेशनवर सुरक्षित पोहोचविले गेले असल्याने यासुका यांचा एलोन मस्क यांच्या स्टारशिप वर पूर्ण विश्वास आहे.
यासुका आणि मस्क या दोघांचेही सोशल मीडियावर मोठ्या संखेने फॉलोअर आहेत. यासुका यांनी त्यांच्या मिशनची तयारी स्वतःच्या युट्यूब चॅनलवर दाखविली जावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. या मिशन साठी यासुका नियमित व्यायाम आणि मानसिक तयारी करत आहेत. या मिशनवर अगोदर त्यांनी गर्लफ्रेंडला नेण्याचा विचार केला होता मात्र आता तो रद्द केला आहे असेही सांगितले जात आहे.