कुठे आहे श्रीकृष्णाचा पांचजन्य शंख?

सनातन धर्मात धार्मिक कार्यात शंखाला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. शंखध्वनी जेथपर्यंत पोहोचतो तेथपर्यंत सकारात्मक उर्जेचा संचार होतो अशी भावना आहे. शंख शक्तीच्या अनेक चमत्कारांचे वर्णन महाभारत, पुराणात आले आहे. शंख हा विजय, समृद्धी, सुख, शांती, यश, कीर्ती, तसेच लक्ष्मीचे प्रतिक मानला गेला आहे. तसेच तो नादाचे प्रतिक आहे. शंखनाद शुभ मानला जातो.

शंखाचे प्रमुख तीन प्रकार आहेत. दक्षिणावर्ती, मध्यावर्ती आणि कामावर्ती. प्राचीन काळी प्रत्येक राजा , वीरांचे स्वतःचे शंख असत. याचे वर्णन महाभारतात आलेले आहे. कृष्णाचा पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त, युधिष्ठिराचा अनंतविजय, नकुल, सहदेवाचे सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख होते. पैकी कृष्णाचा पांचजन्य हा दुर्लभ शंख होता कारण तो समुद्र मंथनातून निघाला होता. समुद्रमंथनातून जी १४ रत्ने निघाली त्यातील सहावा हा शंख होता.

पांचजन्य शंखाचा आवाज कित्येक किमी दूर ऐकू जात असे, युद्धभूमीवर पांडव सेनेत उत्साह आणि कौरव सेनेची घबराट या शंखध्वनीमुळे होत असे. हा शंख विजयाचे प्रतिक होता. याचा आकार पाच बोटांप्रमाणे होता. असे शंख आजही मिळतात पण पांचजन्य ची शक्ती अद्भूत म्हणावी अशीच होती. हा शंख कर्नाल पासून १५ किमी दूर असलेल्या काछवा बहलोलपूर गावात पराशर ऋषींच्या आश्रमात होता असे सांगितले जाते. महाभारत युद्ध संपल्यावर कृष्णानेच हा शंख तेथे ठेवला होता असे मानले जाते. मात्र २० एप्रिल २०१३ मध्ये तो चोरीला गेला असे सांगतात.

काही जणांच्या मते कृष्णाचा पॉवरफुल पांचजन्य शंख आजही आदि बद्री येथे सुरक्षित आहे.