पुजाच्या आजीचा नवीन आरोप; पूजाच्या कुटुंबाकडूनच माझी हत्या होण्याची शक्यता


बीड :पूजाची चुलत आजी शांताताई राठोड यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच माझ्या जीवाचे उद्या बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना शांताताईंनी केले आहे.

शांताताई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आता पूजा चव्हाणच्या कुटुंबावरच शांताताई राठोड गंभीर आरोप केला आहे.

माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. सत्यासाठी मी लढा देत आहे. पुण्यात जाऊन मी तक्रार दिली म्हणून झळ लागली. स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत, अशी टीका शांताताई राठोड यांनी केली. तसेच, माझे रक्ताचे तुम्ही नातेवाईक आहात, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शांताबाई राठोड यांनी माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहेत. मला मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे. संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका असल्याचा दावा केला होता.

पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांनी हा दावा केल्यानंतर शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार परळी शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. हे प्रकरण मिटवण्यासाठी मी 5 कोटी रुपये घेतल्याचा खोटा आरोप शांताबाई राठोड यांनी केला होता. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करत असल्याची भूमिका लहू चव्हाण यांनी घेतली आहे.