सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशावर दिलीप घोष यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया


कोलकाता – सध्या राजकीय वर्तुळात माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान येत्या 7 मार्चला पश्चिम बंगालमध्ये ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेळावा होणार आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली या मेळाव्यात सामील होणार असल्याची शक्यता आहे. तसेच सौरव गांगुली या कार्यक्रमादरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान पश्चिम बंगालचे प्रमुख दिलीप घोष यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही ते मिडियाशी बोलताना म्हणाले.

पश्चिम बंगालचे प्रमुख दिलीप घोष यांना सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता मला याबाबत काहीही माहिती नाही. तसेच याविषयी कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये होणा-या आगामी निवडणूकांमध्ये जोरदार चुरस रंगली आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार आणि कोण वरचढ चढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान भाजपमध्ये सौरव गांगुली गेल्यास त्यांच्या प्रसिद्धीचा आणि असंख्य चाहत्यावर्गाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. ज्यामुळे निवडणुकीचे चित्र देखील बदलेल.

दरम्यान या मेळाव्यात सामील होणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सौरव गांगुली यांनी दिलेली नाही. तथापि त्यांचे स्वास्थ्य जर चांगले असेल आणि त्यांना या मेळाव्यात सामील व्हायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया शामिक भट्टाचार्य यांनी दिली आहे.