मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात मिळणार कोरोनाची लस


मुंबई : कोरोना लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी आता खाजगी रुग्णालयातही लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आता सरकारी रुग्णालयांसोबत 29 खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार असल्याची माहिती दिली आहे. लसीकरणाची परवानगी केंद्र सरकारचे निकष पाळणाऱ्या रुग्णालयांनाच देण्यात आली आहे.

1 मार्च पासून संपूर्ण देशात लसीकरणाचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यास सुरुवात झाली. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुतांश जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात लसीकरणसाठी नोंदणी राज्यभर केल्याचे चित्र आढळून आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. पण लसीकरणासाठी असलेल्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे अनेक नागरिक अनेक तास केंद्रांवर तसेच बसून होते. अनेकांना लस न घेता परतावे लागले तर काहींना केंद्रावरील अभूतपूर्व गोंधळाचा सामना करावा लागला त्यामुळे हा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. 29 खासगी हॉस्पिटलला संध्याकाळी आयुक्तांकडून लसीकरणासाठी मंजूरी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात ट्विट केले आहे.

कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरु झाला असून यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल 25 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केली होती.