नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर Amazon ने बदलला App Logo


नवी दिल्ली – आपल्या नवीन अ‍ॅप आयकॉनच्या डिझाइनमध्ये दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) बदल केला आहे. कंपनीने हा निर्णय आपल्या ग्राहकांकडून आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि नेटकऱ्यांकडून विरोध झाल्यानंतर घेतला. जर्मनीचा हुकूमशाह हिटलरच्या मिशीसोबत अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या ‘लोगो’ची तुलना झाल्यामुळे कंपनीने लोगो बदलला आहे.

जानेवारीमध्ये नवीन अ‍ॅप आयकॉनची डिझाइन अ‍ॅमेझॉनने सादर केली होती. नवीन आयकॉनला 25 जानेवारी 2021 रोजी अ‍ॅपवर अपडेट करताच सोशल मीडियातून विरोध होण्यास सूरूवात झाली. यात फिक्कट तपकिरी रंगाच्या कार्डबोर्ड बॉक्स दिसत असून त्याच्यावर कंपनीची सिग्नेचर स्माइल आणि टॉपला निळ्या रंगाची एक टेप होती.

निळ्या रंगाच्या टेपवरुन सर्व वाद सुरू झाला. अनेक सोशल अ‍ॅमेझॉनच्या या नवीन आयकॉनला हिटलरच्या मिशीसोबत मीडिया युजर्सनी जोडले आणि टीकेला सुरूवात झाली. डिझाइनबाबत पुन्हा विचार करण्याचा सल्लाही अनेकांनी दिला होता. अखेर आता कंपनीने आपल्या लोगोमध्ये बदल केला आहे. अपडेट केलेल्या डिझाइनमध्ये फिक्कट तपकिरी रंगाचा कार्डबोर्ड बॉक्स आणि त्यावरील कंपनीची सिग्नेचर स्माइल तशीच आहे. पण निळ्या रंगाच्या टेपची स्टाइल बदलण्यात आली आहे, आता अर्धी टेप काढलेली दिसत आहे. हिटलरच्या मिशीप्रमाणे दिसू नये यासाठी कंपनीने हा बदल केला आहे.