स्वीडनच्या वाचनालयात आहे रहस्यमयी सैतानी बायबल

प्रत्येक धर्माचा पवित्र ग्रंथ असतो, हिंदूंची गीता, इस्लामचे कुरान तसेच क्रिश्चन धर्मियांचे बायबल हे पवित्र ग्रंथ आहेत. पण जगात असेही एक पुस्तक आहे ज्याला डेविल्स बायबल म्हणजे सैतानाचे बायबल म्हणून ओळखले जाते. हे पुस्तक रहस्यमयी आहेच पण ते एका रात्रीत लिहिले गेले असे मानले जाते. या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर सैतानाची चित्रे आहेत. या पुस्तकाला कोडेक्स गीगास असेही म्हटले जाते.

हे पुस्तक जगातील सर्वात खतरनाक पुस्तक म्हणून परिचित आहे. ते कुणी आणि का लिहिले हे नक्की माहिती नाही. ते सध्या स्वीडनच्या एका वाचनालयात सुरक्षित ठेवले गेले असून हजारोंच्या संख्येने हे पुस्तक पाहण्यासाठी लोक येतात. त्यामागे कुतूहल हे कारण आहे. या पुस्तकाची पाने चामड्याची असून १६० पानी पुस्तकाचे वजन ८५ किलो आहे. ते उचलायला किमान दोन माणसे लागतात.

याची कथा अशी सांगितली जाते की, १३ व्या शतकात एका संन्यास्याने मठाचे नियम तोडले म्हणून त्याला भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा दिली गेली. यातून वाचण्यासाठी त्याने एका रात्रीत एक पुस्तक लिहून पूर्ण करण्याचा वादा केला. या पुस्तकामुळे मठाचा गौरव होईल असेही त्याने सांगितले तेव्हा त्याला परवानगी दिली गेली. पण अर्ध्या रात्रीत त्याला हे पुस्तक आपण एकटे पुरे करू शकत नाही याची जाणीव झाल्यावर त्याने विशेष प्रार्थना करून सैतानाला आमंत्रित केले आणि माझ्या आत्म्याच्या बदली हे पुस्तक पूर्ण करून दे अशी विनंती केली आणि सैतानाने ती मान्य केली.

तज्ञांच्या मते एका रात्रीत त्या काळी चामड्यावर १६० पानांचे पुस्तक लिहिणे ही अशक्य बाब आहे. इतकी पाने लिहिण्यासाठी त्या काळी किमान २० वर्षे लागली असती. पण दुसरे आश्चर्य असे की हे सर्व लिखाण एकच अक्षरात आहे त्यामुळे २० वर्षे कुणी एक सारखे अक्षर काढू शकेल हेही अशक्य मानले जाते.