रिलायंस जिओने केला सर्वाधिक स्पेक्ट्रम खरेदी

दूरसंचार विभागाने पुकारलेला दोन दिवसांचा स्पेक्ट्रम लिलाव मंगळवारी संपला असून रिलायंस जिओ स्पेक्ट्रमची सर्वाधिक मोठी खरेदीदार ठरली आहे. विभाग सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सने स्पेक्ट्रमसाठी ५७,१२२.६५ कोटींची बोली लावली. दोन दिवसांच्या लिलावात एकूण ७७,८१४.८० कोटींची स्पेक्ट्रम खरेदी झाली.

यात व्होडाफोन आयडियाने १९९३.४० कोटींचा स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. त्यांनी ५ सर्कल मधील स्पेक्ट्रमची खरेदी केली असून त्यामुळे त्यांची फोर जी कव्हरेज क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. भारती एअरटेलने १८६९९ कोटींची खरेदी केली असून त्यामुळे त्यांना भविष्यात फाईव्ह जी सेवा पुरविण्यास मदत मिळणार आहे.

रिलायंस जिओने सर्व २२ सर्कल मधील स्पेक्ट्रम खरेदी केली आहे त्याचा वापर फाईव्हजी सेवा देण्यासाठी होणार आहे. त्यांनी एकूण १७१७ मेगाहर्टची खरेदी केली आहे. ही खरेदी पूर्वीच्या तुलनेत ५५ टक्के अधिक आहे. रिलायंसने नुकतीच स्वदेशी फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित केल्याची आणि त्याच्या अमेरिकेत चाचण्या घेतल्या गेल्याची घोषणा केली होती. तर अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याच वर्षात देशात फाईव्ह जी सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.

अंबानी यांनी जिओने भारतात डिजिटल क्रांती घडविल्याचे आणि भारतात डिजिटल फुटप्रिंटचा अधिक विस्तार करण्यास तयार असल्याचे यावेळी सांगितले होते.