मुष्टियोद्धा विजेंदर अनोख्या लढतीसाठी तयार
भारताचा व्यावसायिक मुष्टियोद्धा विजेंदरसिंग त्याचा पुढचा मुकाबला १९ मार्च रोजी गोव्यात खेळत असून विजेंदरसाठी हा मुकाबला अनोखा आहे. कारण हा मुकाबला प्रथमच जहाजाच्या डेकवर होणार आहे. अर्थात विजेंदरच्या प्रतिस्पर्ध्याची घोषणा अजून झालेली नाही. ३५ वर्षीय विजेंदरने जागतिक बॉक्सिंग संघटनेच्या ओरिएंटल व एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चँपियनशिप मिळविलेली आहे.
विजेंदरने नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने घानाच्या माजी राष्ट्रमंडळ चँपियन चार्ल्स अदामूला दुबईत पराभूत करून सलग १२ वा विजय नोंदविला होता. त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. विजेंदरचे प्रमोटर आयओएस बॉक्सिंग प्रमोशन्स यांनी १९ मार्च रोजी स्टार बॉक्सर विजेंदर पुन्हा १९ मार्च रोजी रिंगणात उतरत असल्याची घोषणा केली आहे. हा सामना गोव्यात पणजी मधल्या मांडवी नदी किनारी नांगरलेल्या मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो जहाजाच्या डेकवर होणार आहे. या ठिकाणी प्रेक्षकांना वेगास शैलीतील चमक धमक आणि ग्लॅमरचा अनुभव घेता येईल असे सांगितले जात आहे.
विजेंदरच्या म्हणण्यानुसार भारतात या प्रकारची लढत प्रथमच होत असल्याने तो याचा अनुभव घेण्यास उत्सुक आहे. या लढतीसाठी विजेंदर कसून सराव करत असल्याचेही सांगितले जात आहे.