ट्रम्प यांच्या १० सेकंदाच्या व्हिडीओची ४८ कोटीत विक्री

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर बनविल्या गेलेल्या एका १० सेकंदाच्या व्हिडीओची विक्री ४८ कोटींना झाल्याची बातमी वेगाने व्हायरल झाली आहे. मायामीच्या रॉड्रीग्ज फ्राइल या संग्रहाकाने हा व्हिडीओ आक्टोबर २०२० मध्ये भारतीय चलनानुसार ४९ लाख रुपयांना खरेदी केला होता. विशेष म्हणजे हा व्हिडीओ ऑनलाईनवर फ्री उपलब्ध आहे. हाच व्हिडीओ त्याने गेल्या आठवड्यात ४८.३ कोटींना विकला आहे.

या विक्रीमुळे केवळ या व्हिडीओची खासियतच नाही तर ऑनलाईन लिलावाची क्रिप्टोकरन्सी नॉन फंजीबल टोकन (एनएफटी) चर्चेत आले आहे. या व्हिडीओ मध्ये ट्रम्प एका बागेसारख्या ठिकाणी गवतावर पहुडलेले असून त्यांच्या शरीरावर अनेक स्लोगन्स आहेत त्यात ‘लूझर’ हे स्लोगन मोठया अक्षरात दिसते आहे. ट्रम्प यांच्या समोरून अनेक लोक जातात पण ट्रम्प यांच्याकडे कुणी ढुंकून सुद्धा पाहत नाही असेही यात दिसते आहे.

डिजिटल आर्टिस्ट माईक विन्कलमन याने हा व्हिडीओ केला आहे. त्याला ऑनलाईन बिपल या नावानेही ओळखले जाते. एनएफटी एकप्रकारचा डिजिटल अॅसेट असून कोविड १९ च्या काळात आलेले आहे. त्याने डिजिटल दुनियेतील लोकांचा रस वाढविलाच पण गुंतवणूकदार याच्या माध्यमातून फक्त ऑनलाईनवरच असलेल्या वस्तूंवर खर्च करतात. या वस्तू एक्सचेंज करता येत नाहीत. त्यात डिजिटल आर्टवर्क स्पोर्ट्स कार्ड्स, आभासी जमीन अश्या अनेक वस्तूंचा समावेश होतो. ओपन सीच्या रिपोर्ट नुसार ही मासिक विक्री काही महिन्यांपूर्वी  ८० लाख डॉलर्सच्या घरात होती ती आता ८.६३ कोटी डॉलर्सवर गेली आहे.