कोण लिहितो मोदींची भाषणे? माहिती अधिकारातून झाला खुलासा

पंतप्रधान मोदी यांची भाषणे ते स्वतःच तयार करतात असा खुलासा माहिती अधिकार कायद्याखाली मागविलेल्या माहितीतून झाला आहे. पंतप्रधान मोदी दररोज किमान एखादे भाषण देतात असे म्हटले तर गैर नाही. बहुतेक दररोज मोदी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भाषण देतात. मग ती राजकीय सभा असो, विद्यार्थी संवाद असो, एखादा उद्घाटन समारंभ असो किंवा आंतरराष्ट्रीय परिषद असो. बऱ्याच लोकांना मोदींची भाषणे कोण लिहून देतो याचे औत्सुक्य होते आणि यामुळे इंडिया टुडे ने पंतप्रधान कार्यालयाकडे या संबंधातील माहिती माहिती अधिकार कायद्याखाली मागविली होती.

पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या अर्जानुसार मोदींना भाषणे लिहून देणाऱ्या लोकांची नावे आणि त्यांचे नंबर सुद्धा मागविले गेले होते. तसेच या लोकांना त्यासाठी किती पैसे दिले जातात ही माहिती मिळविण्याचाही प्रयत्न केला गेला होता. याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाले आहे. त्यानुसार पंतप्रधानांना विविध माध्यमातून त्यांना आवश्यक असलेली माहिती एकत्र करून दिली जाते आणि त्यावरून पंतप्रधान स्वतःच भाषणाचा अंतिम मसुदा तयार करतात. कार्यक्रमाचे स्वरूप जसे असेल त्यानुसार पंतप्रधानांना माहिती दिली जाते. अर्थात या साठी किती खर्च केला जातो याचा खुलासा केला गेलेला नाही असेही समजते.