कोरोना लसीसाठी तरुणांना प्राथमिकता दिली पाहिजे – मल्लिकार्जून खर्गे


नवी दिल्ली – कालपासून देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे या टप्प्यात लसीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केले जात आहे. अनेक नेतेही लसीकरणासाठी पात्र आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, व्यंकय्या नायडू यांनी लसीकरण करुन घेतले. त्याचबरोबर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील कोरोना लस घेतली.

दरम्यान कोरोना लसीसाठी तरुणांना प्राथमिकता दिली पाहिजे, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केले आहे. माझे वय ७० पेक्षा जास्त आहे. तुम्ही कोरोना लस तरुणांना दिली पाहिजे आणि त्यांचे आयुष्य वाढवावे. जगण्यासाठी माझ्याकडे १० ते १५ वर्षच आहेत. पण तरुणांसमोर मोठे आयुष्य आहे. मी देखील कोरोना लस घेणार असल्याचे खर्गे एएनआयशी बोलताना म्हणाले आहेत.

८ मार्चला अधिवेशन सुरु होण्याआधी पात्र असणाऱ्या सर्व खासदारांना लस दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ७७७ खासदारांपैकी ३६६ खासदारांचे वय ६० हून अधिक असून लसीकरणास ते पात्र आहेत. १६ जानेवारी रोजी पहिला टप्पा सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील कोरोनायोद्धय़ांच्या लसीकरणासाठी सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशी वापरल्या गेल्या.

पहिल्या टप्प्यात दोन्ही लशींच्या परिणामकारकतेबाबत शंका घेतल्या गेल्या होत्या. तिसरी चाचणी न झालेल्या देशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापरास परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीकाही झाली होती. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता.