जे जे रुग्णालयात सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोना लस


मुंबई – कालपासून देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाने झाली. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात सकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ची लस घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील लस घेतली असून पात्र असणाऱ्या सर्वांना घेण्याचं आवाहन केले आहे. तत्पूर्वी जे जे रुग्णालयात जाऊन याआधी शरद पवार यांनीदेखील कोरोना लस घेतली.


सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लस घेतल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मुंबईमधील जे जे रुग्णालयात मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. डॉक्टर लहाने आणि जे जे रुग्णालयातील सर्व टीमचे आभार. कोरोना लस सुरक्षित आहे. सर्वांना विनंती आहे की, नोंदणी करा आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा लस घ्या. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येत आहे. त्याचबरोबर ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केले जाईल.