पती कितीही क्रूर असला तरी त्या दोघांमधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का? – सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली – एका प्रकरणामध्ये लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला दिलासा देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या व्यक्तीला अटकेपासून आठ आठवड्यांसाठी संरक्षण देण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने हा निकाल देताना वैवाहिक बलात्कार (मॅरिटल रेप) म्हणजेच विवाह झाल्यानंतर बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्याच्या तक्रारींसंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

न्यायालयाने एकमेकांसोबत पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या जोडप्यामधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्नही उपस्थित केला आहे. जर एखादे जोडपे पती पत्नी म्हणून एकमेकांसोबत राहत असेल तर पती कितीही क्रूर असला तरी त्या दोघांमधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का?,” असा प्रश्न सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. वी. राजसुब्रमण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने उपस्थित केला आहे.

खंडपीठाने हे निरिक्षण वेगवेगळ्या प्रकरणांसर्भात निकाल देताना नोंदवले आहे. या याचिकांपैकी एका याचिका आरोपीचीही आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एप्रिल २०१९ मध्ये दिलेल्या निकालाला या आरोपीने आव्हान दिले आहे. आरोपीच्या विरोधात उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची नोंद रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली होती.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलाने आरोपीने महिलेची फसवणूक करुन तिची सहमती मिळवल्याचा दावा केला. महिलेला आरोपी २०१४ साली हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील एका मंदिरामध्ये घेऊन गेला आणि त्यांनी तिथे लग्नाच्या विधी केल्याची माहिती वकीलाने दिली.

लग्नाचे खोटे आश्वासन देणे चुकीचे आहे. अशाप्रकारचे आश्वासन देऊन नंतर कोणत्याही महिलेनेही शब्द फिरवता कामा नये, असे मत खंडपीठाने नोंदवले. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्त मखीजा यांनी आरोपी आणि महिला दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यानंतर या महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३७६ (बलात्कार) च्या अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये याचिकाकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला त्रास देण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा, याचिकार्त्याचे वकील मखीजा यांनी केला आहे. तर ही तक्रार दाखल करणाऱ्या महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीने केवळ या महिलेचा पती असल्याचे नाटक केले.

पण त्याने नंतर दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप केला. आरोपीने महिलेला मारहाण केल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले असून न्यायालयासमोर दोघांमधील शरीरसंबंधांसंदर्भातील वैद्यकीय पुरावेही दाखल करण्यात आले. मात्र पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या या दोघांमधील संबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. या व्यक्तीला अटकेपासून आठ आठवड्यांची सुरक्षा देण्यात आली आहे.