‘सिटी ऑफ डेड’ बद्दल कधी ऐकलंय?

आजकाल पर्यटन क्षेत्र फारच वेगाने प्रगती करत असून जगभरातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात. निसर्ग सौंदर्य, आधुनिकता अशी वैशिष्ठे असलेली शहरे, गावे, डोंगर दऱ्या, समुद्र किनारे पर्यटकांना जसे भुरळ घालतात तसेच काही रहस्यमयी जागा, ऐतिहासिक महत्वाची स्थळे सुद्धा पर्यटकांना आकर्षित करत असतात. रशियातील एक गाव मात्र रहस्यमय असूनही पर्यटक तेथे जाण्यास तयार होत नाहीत कारण येथे जाणारा परत येत नाही असा त्याचा लौकिक आहे. या गावाचे नावच मुळी सिटी ऑफ डेड म्हणजे मुडद्यांचे गाव असेच आहे.

रशियाच्या उत्तर ओसेटीया भागात दर्गाव्स नावाचे हे गाव उंच डोंगर रांगांच्या मध्ये लपलेली एक प्राचीन विराण जागा आहे. येथे पांढऱ्या दगडांच्या चार चार मजली इमारती आणि अनेक छोट्या झोपड्या आहेत. इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर प्रेते दफन केली आहेत. प्रत्येक मजल्यावर एकच कुटुंबातील लोकांची प्रेते दफन केली आहेत यामुळे मृत्यूनंतर सुद्धा ते एकमेकांशी भावनात्मक जोडलेले राहतील अशी भावना आहे.

या गावात एकही नदी नाही मात्र या घरातून अनेक नौका आहेत. अनेक झोपड्यातून एकच परिवारातील लोकांचे दफन करताना तेथे नावा किंवा नौका ठेवल्या गेल्या आहेत. स्वर्गात जाताना नदी पार करावी लागते असा विश्वास होता आणि त्यामुळे प्रेते नावेत ठेवली तर त्यांच्या आत्म्यांना नदी पार करणे सोपे होईल अशी भावना यामागे होती असे सांगितले जाते.

हे गाव १४ व्या शतकातील आहे असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे येथे प्रत्येक झोपडीसमोर एक विहीर आहे. प्रेत दफन केल्यावर या विहिरीत एक नाणे फेकले जात असे. ते नाणे जर थेट तळात जाऊन खालच्या खडकावर आपटले तर मृताचा आत्मा स्वर्गात गेला असे मानले जात असे.