कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करताना, काळजी घ्या… अन्यथा रिकामी होऊ शकते बँक खाते


नवी दिल्ली : तुम्ही जर कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीसाठी स्वत:च्या नावाची ऑनलाईन नोंदणी करणार असाल तर जरा जपून. बनावट अ‍ॅपवर कोरोना लसीसाठी अनेक नागरिक रजिस्ट्रेशन करू लागले आहेत. सायबर गुन्हेगारांनी या ठिकाणीही घुसखोरी केली आहे. लसीकरणाचाही गैरफायदा उचलण्यास गुन्हेगारांनी सुरुवात केली आहे. को-विनसारखेच बनावट संकेतस्थळ तयार करून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहे.

सोशल मीडियात बनावट संकेतस्थळांचा मेसेज प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा मेसेज वाचून जर तुम्ही को-विन अ‍ॅपमध्ये नोंदणी करणार असाल तर सावधगिरी बाळगायला पाहिजे. कारण बेफिकीर नोंदणीमुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. सायबर गुन्हेगार आपल्या गोपनीय माहिती मिळवून बँक खात्यांवर डल्ला मारू शकतात. सरकारने याबाबत नागरिकांना अ‍ॅलर्ट केले आहे.

अनेक नागरिकांनी को-विनच्याच नावाने बनवलेल्या बनावट संकेतस्थळांवर आपली माहितीही अपलोड केली आहे. या संकेतस्थळांवर नागरिक आपले रजिस्ट्रेशन करून मोकळे झाले आहेत. आता या नागरिकांना फसवणूक झाल्याची भिती सतावत आहे. बनावट संकेतस्थळावर नोंदवलेला स्वत:चा तपशील हटवण्याचा हे नागरिक प्रयत्न करीत आहेत. पण तपशील हटवण्याचा पर्यायच नसल्यामुळे अनेकांनी कपाळावर हात मारला आहे. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सरकारच्या पीआयबी पथकाने दिशानिर्देश जारी केले आहेत.

एक लिंक बनावट संकेतस्थळावर शेअर करण्यात आली आहे. लिंकवर क्लिक करताच सरकारच्या पेजशी हुबेहुब असलेले दुसरे बनावट पेज खुले होते. त्यावर एक फॉर्मही उघडतो. आपला तपशील भरण्यास ज्या फॉर्ममध्ये सांगितले जाते. हा सगळा तपशील व ओटीपी नंबर मागवून घेतला जातो. त्यानंतर रुग्णालयांची अर्थात लसीकरण केंद्रांची नावेही दाखवली जाते. मात्र यातून आपली फसवणूक झाली हे नागरिकांच्या उशिराने लक्षात येत आहे.

नागरिकांना बनावट संकेतस्थळांबाबत केंद्र सरकारच्या पीआयबी पथकाने अ‍ॅलर्ट केले आहे. http://selfregistration.preprod.co-vin.in हे संकेतस्थळ सरकारच्या को-विन संकेतस्थळाशी मिळतेजुळते आहे. यावरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा संकेतस्थळांना बळी न पडता कोरोना लसीकरणाबाबत कुठलीही आवश्यक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा @MoHFW_INDIA या ट्विटर अकाउंटला भेट द्यावी, असे पीआयबी टीमने स्पष्ट केले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी कुठलेही अ‍ॅप नसल्याचा खुलासा केला आहे. प्ले स्टोअरमधील को-विन अ‍ॅप हे सर्वसामान्य नागरिकांसाठी नसून ते केवळ सरकारी कामकाजाच्या वापरासाठी आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवरून हे स्पष्टीकरण दिले आहे.