घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग चौथ्यांदा वाढ


नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलनंतर आता पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आल्यामुळे ग्राहकांना 819 रुपये 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी मोजावे लागणार आहे. एलपीजी गॅसच्या दरात 24 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे मुंबईत घरगुती सिलेंडर आता 794 रूपयांवरून 819 रुपयांवर पोहचला आहे.

एका महिन्यात चौथ्यांदा वाढ झाल्याने एकूण 100 रुपयाची वाढ केवळ तीन आठवड्यातच सिलेंडरच्या किंमतीत झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

दोनदा प्रत्येकी 50 रुपयांची वाढ राष्ट्रीय तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांनी केली होती. या किंमतीत जानेवारीत जरी कोणतीही वाढ झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांचा विचार केला तर एकूण 200 रुपयांची वाढ झाल्यामुळे सामान्य जनतेला सातत्याने महागाईला सामोरे जावे लागत आहे. एलपीजीच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रोपेन आणि ब्युटेन यांच्या किंमतीवर तसेच डॉलर आणि रुपयाच्या एक्सचेन्ज रेटवर अवलंबून असतो.

दरम्यान आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर येथे एका कार्यक्रमात एलपीजी ग्राहकांसाठी मिस्ड कॉल सुविधा सुरू केली. जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना संपूर्ण भारतभरात रिफिल बुकिंगसाठी आणि भुवनेश्वर शहरात नव्या कनेक्शनसाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉलच्या सुविधेचा वापर करता येईल.