पंजाब सरकारमध्ये प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा


चंदीगड : आता पंजाब सरकारमध्ये राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. प्रशांत किशोर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. ही नियुक्ती आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

एक ट्विट करून यासंदर्भातील माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली. मला सांगायला आनंद होत आहे की, प्रशांत किशोर यांची माझे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आम्ही पंजाबच्या जनतेच्या कल्याणासाठी एकत्रित काम करण्यासाठी तत्पर आहोत. कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा त्यांना देण्यात आल्याचे अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यासाठी प्रशांत किशोर फक्त एक रुपया वेतन घेणार आहेत. तसेच पंजाब सरकारकडून प्रशांत किशोर यांना बंगला, कार्यालय, संपर्क माध्यमे अशा अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे प्रवास, मेडिकल आणि अन्य सुविधा प्रशांत किशोर यांना दिल्या जातील, असे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने प्रशांत किशोर यांच्या कार्यकाळाबाबत माहिती देताना सांगितले की, प्रशांत किशोर यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणे असेल. एक खासगी सचिव, एक डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्लार्क आणि दोन शिपाई प्रशांत किशोर यांना दिले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रशांत किशोर यांच्या मोबाइल आणि संपर्काचा खर्चही सरकारकडून केला जाईल, असे सांगितले जात आहे.