संजय राठोडांप्रमाणे धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा : पंकजा मुंडे


मंबई : आपण पुरोगामी महाराष्ट्र असे राज्याला म्हणवतो आणि या राज्यातील नेत्यांकडून पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणे प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी असून सरकार, युती टीकवण्यासाठी फक्त आणि फक्त चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जात आहे, असा नाराजीचा सूर आळवत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

आपल्या पदाचा वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा, पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांच्या धर्तीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.

तपास यंत्रणांनी पूजा चव्हाण प्रकरणात अत्यंत नि:पक्षपातीपणे आणि वेगाने तपास करणे आवश्यक असल्याचे म्हणत, या गोष्टींचा तपास धर्माच्या पलीकडे जाऊन योग्य आणि अपेक्षित त्या मार्गाने होण्यासाठी त्या आग्रही दिसल्या. सोबतच सदर प्रकरणी पूजा चव्हाणची ओळख जाहीरपणे सर्वांसमोर आणल्या गेल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला.

पूजा चव्हाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्यातील वनमंत्रीपदी असणाऱ्या संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्या धर्तीवर आता रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही पंकजा मुंडे यांनी उचलून धरल्याचे पाहायला मिळाले.