आरोग्य तज्ज्ञांचा इशारा : …अन्यथा यंदाची होळी कोरोना वाढीसाठी आमंत्रण देणारी ठरेल


नवी दिल्ली – आरोग्य तज्ज्ञांनी यंदाच्या होळीत नागरिकांनी खबरदारी न घेता रंग खेळणे ही बाब कोरोना वाढीसाठी आमंत्रण देणारी ठरेल, असा इशारा दिला आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मिरमध्ये वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे.

सुमारे 35 दिवसांनंतर दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या स्थितीत भारतीयांचे सामाजिक मेळावे किंवा जाहीर सभा आयोजित करणे योग्य नाही. तसेच देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेनही समोर आल्याचे मत त्यांनी मांडले आहे. विशेषतः होळीच्या वेळी जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येत खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिले पाहिजे.

कारण सोशल डिस्टन्सिंग या काळात पाळले जात नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. होळीच्या काळात सध्याच्या तुलनेत अनेक पटीने रुग्ण वाढू शकतात. यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. खुल्या मनाने नागरिकांचे स्वागत करा, पण हात मिळवणे आणि मिठी मारण्यापासून टाळण्याचे आवाहन केले आहे.

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणासह 18 राज्यांमध्ये जवळपास 200 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे नवीन स्ट्रेन हे अतिशय संसर्गजन्य असल्यामुळे याचा प्रादुर्भाव वेगाने होतो. पण ते किती जीवघेणे आहेत, याची माहिती अद्याप समोर आली नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.