मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; अमोल मिटकरी


मुंबई: शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर टीका करत इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. भाजप आता सुडाचे राजकारण करत आहेत. मूळ विषयाला बगल देण्याचे काम भाजप करत आहे. भाजपने कालपर्यंत संजय राठोड प्रकरण उचलून धरले आणि आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केवळ पेट्रोल- डिझेलसह इतर मुद्द्याला बदल देण्यासाठी भाजप काहीही आरोप करत असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. कोरोनाची लस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. कोरोनाची लस महाराष्ट्रातील जनतेनेही घ्यावी. आपले राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी जनतेनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.