हिंगोलीत आजपासून 7 मार्च पर्यंत संचारबंदी लागू


हिंगोली – सोमवार 1 मार्चपासून हिंगोली शहरासह जिल्हाभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. तर हिंगोली बसस्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या सर्वच प्रवाशांच्या अँटीजन चाचण्या केल्या जात आहेत. आज दुपारपर्यंत या चाचणीत 4 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत.

मागील चार दिवसांत हिंगोली जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या चांगलीच वाढली आहे. सध्याच्या स्थितीत २३२ रुग्णांवर उपचार केला जात आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर १ मार्च ते ७ मार्च या कालावधी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.

हिंगोलीतील सर्वच रस्त्यांवर संचारबंदीमुळे शुकशुकाट होता. शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवूनच कार्यालयास जाण्याची परवानगी देण्यात आली. तर हिंगोली आगारातून बसफेऱ्या सोडण्यात आल्या नाही. पण इतर आगाराच्या हिंगोली बसस्थानकावर आलेल्या बसमधून उतरलेल्या प्रवाशांची बसस्थानकावरच रॅपीड ॲन्टीजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दुपार पर्यंत ४ प्रवाशी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हिंगोली शहर व जिल्हयात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्यासाठीच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरीकांनी संचारबंदीच्या काळात बाहेर पडू नये. तसेच ठिकठिकाणी अँन्टीजन कॅम्प लावण्यात आले असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयित रुग्णांनी या ठिकाणी चाचणी करून घ्यावी. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास प्रतिबंध करणे शक्य होणार असल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.