मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतल्यावरुन प्रकाश आंबेडकरांची टीका


पुणे- आजपासून देशातील तिसऱ्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणास सुरूवात झाल्यानंतर आज(मंगळवार) सकाळी ७ वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भातील माहिती मोदींनीच ट्विटरवरुन फोटो पोस्ट केल्यानंतर समोर आली. मोदींसोबत या फोटोमध्ये दोन नर्सही दिसत आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींनी लस घेतल्यानंतर एका वेगळ्या मुद्य्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.

दररोज हिंदू निष्ठेचे ढोल पंतप्रधान नरेंद्र मोदी बडवतात पण हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही, म्हणून ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली, काय वागणे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पी. निवेदा असे मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचे नाव असुन, त्या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच, पी. निवेदा यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या परिचारिकेचे नाव रोसामा अनिल असुन त्या केरळच्या असल्याची माहिती समोर आली आहे.

तर, या फोटोत लस घेताना मोदी हसत असल्याचे दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला असून मोदींना लस देणाऱ्या दोन्ही परिचारिकांनी डीडी न्यूजला मोदींना दिलेल्या लसीसंदर्भातील माहिती दिली आहे.


दरम्यान मी एम्समध्ये मागील तीन वर्षांपासून काम करत आहे. कोरोना लसीकरण केंद्रात सध्या मी कार्यरत आहेत. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणासाठी येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. पीएम सरांना लस देण्यासाठी मला बोलवण्यात आले, तेव्हा ते लस घेण्यासाठी पोहचल्याचं समजले, असे निवेदा यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना, मोदी सरांना भेटून खूप छान वाटले. आमच्याशी त्यांनी खूप छान गप्पा मारल्या. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस त्यांना देण्यात आली असून २८ दिवसांनंतर पुढील डोस देण्यात येणार असल्याचेही पी. निवेदा म्हणाल्या.

या परिचारिकांना मोदींनी काय विचारले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुम्ही मुळच्या कुठून आहात वगैरे चौकशी पंतप्रधानांनी केली. तसेच कोरोनाची लस दिल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया देताना, लस कधी दिली ते सुद्धा कळले नाही, (लगा भी दिये, पता भी नही चला) असे म्हटल्याची माहिती पी. निवेदा यांनी दिली.