काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांकडे सोपवली मोठी जबाबदारी


नवी दिल्ली – काँग्रेसने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे काँग्रेसने अध्यक्ष बनवले आहे. विशेष म्हणजे चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत आहेत. अशात चव्हाणांना स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवल्याने पक्षांतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये 27 मार्चला येथे मतदान होणार आहे. एकूण तीन टप्प्यांत येथे मतदान होणार आहे. काँग्रेसने अशातच पृथ्वीराज चव्हाणांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवले आहे. चव्हाणांसोबतच रिपून बोरा आणि जितेंद्र सिंह यांनाही मोठी जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, G-23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात चव्हानांनीही स्वाक्षरी केली होती. पण, पृथ्वीराज चव्हाण गुलाम नबी आझादांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावेळी दिसले नव्हते.

काँग्रेस चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवून, एक प्रकारे G-23 नेत्यांना, पक्ष त्यांच्याकडे दूर्लक्ष करत नाही. असा संदेश देत असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 27 मार्चला 126 सदस्य संख्या असलेल्या आसाम विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिलला होईल. या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 31 मेरोजी संपत आहे. अशात आसाममध्ये सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचार करत आहेत.

काँग्रेसचे जेष्ट नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. गुलाम नबींच्या नेतृत्वात 27 फेब्रुवारीला काँग्रेसचे G-23 म्हटले जाणारे नेतेही एकत्र आले होते. यांत कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि राज बब्बर यांच्यासारखे दिग्गज नेतेही होते. यावेळी काँग्रेस दुबळी झाली आहे, हे आपण स्वीकारायला हवे, असे सिब्बल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.