अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी अंधेरी न्यायालयाने यांनी जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ती समन्स बजावूनही हजर राहू शकली नाही, त्यानंतर हे पुढचे पाऊल अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी कंगना विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी
कंगना हिच्याविरूद्ध अंधेरी न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतर न्यायालयात हजर असलेल्या कंगनाच्या वकिलाने वरच्या न्यायालयात या वॉरंटला आव्हान देणार असल्याचे सांगितले असून २६ मार्चला पुढील सुनावणी आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगनाला नोटीस बजावली होती.
जावेद अख्तर यांची रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना घेतलेल्या एका मुलाखतीत बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे. या प्रकरणी दंडाधिकारी आर. आर. खान यांनी जुहू पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर केलेल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद यांचे वकील कुमार भारद्वाज यांनी न्यायालयाला सांगितले होते.
अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाईड गॅंग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. जावेद यांची प्रतिमा तिच्या या आरोपांमुळे मलिन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप व्हायरल झाल्याचा युक्तिवाद भारद्वाज यांनी केला होता.
पोलीस कंगनाची चौकशी करण्यासाठी तिला वारंवार समन्स बजावत होते. पण, ती त्याला उत्तर देत नसल्याची माहिती भारद्वाज यांनी दंडाधिकाऱ्यांना दिली होती. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली होती. १ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला देण्यात आले होते.