नवी दिल्ली – सध्या देशभरात अयोध्या येथे निर्माण होणाऱ्या राम मंदिरासाठी देणगी घेण्याचे अभियान सुरु होते. शनिवारी 44 दिवसांचे हे अभियान समाप्त झाले. दरम्यान, राम मंदिरासाठी आलेला देणगीचा एक चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील रक्कमेचा अंक चक्क ‘रामराम’ असा लिहिण्यात आला आहे. खरंतर ही रक्कम 2,14,214 रुपये एवढी आहे. पण या अंकामधून क्रिएटीव्हीटीचा वापर करत रामराम असे लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यामुळे हा चेक अवैध ठरत नाही. कारण रक्कमेचे अंक योग्य पद्धतीत लिहिले आहे. या अनोख्या चेकची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
सोशल मीडियात व्हायरल होत आहे राम मंदिरासाठी दिलेल्या देणगीचा अनोखा चेक
214214/-में राम भक्त की राम राम pic.twitter.com/ju0SfG8Ik0
— मुकेश अग्रवाल (@Rashtradharam) February 28, 2021
अयोध्यामधील राम मंदिरासाठी निधी उभारणी संबंधित ट्रस्टने सांगितले की, 2,100 कोटींपेक्षा जास्त रुपये देणग्यांमध्ये प्राप्त झाले आहेत. राम मंदिरासाठी देगणी स्वीकारण्याची मोहिम 15 जानेवारीपासून सुरु झाली होती. 44 दिवसांनंतर शनिवारी अखेर ती समाप्त झाली. निधी जमा करण्याची मोहीम भारतातील दुर्गम खेड्यांमधील रहिवाशांसह सर्व धार्मिक वर्गाच्या उदार योगदानामुळे संपुष्टात आली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत 2100 कोटी रुपयांहून अधिक दान मिळाल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, 1,100 कोटी रुपये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रामजन्मभूमी येथे संपूर्ण संकुलाच्या बांधकामाचा अंदाज होता. तर मंदिराच्या बांधकामासाठी 300 ते 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, राम मंदिर कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे बजेट अंतिम नसून बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच हे कळेल, असे ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले.