या सुंदर पक्ष्याच्या मिशांची शान काही औरच

बिगबी अमिताभ यांच्या शराबी या चित्रपटातील एक संवाद खुपच लोकप्रिय झाला होता. ‘मुंछे हो तो नथूलाल जैसी, वरना ना हो’ असा हा डायलॉग होता. या कुणा नत्थूलाल ला आव्हान देणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शानदार मिशा असलेला हा फोटो कुणा माणसाचा नाही तर एका पक्ष्याचा आहे.

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवर हा फोटो शेअर केला आहे. या पक्ष्याचे नाव आहे इंका टर्न आणि हा पक्षी प्रामुख्याने पेरू आणि चिले या देशांच्या किनारपट्टीवर आढळतो. हा समुद्री पक्षी आहे.

भुरकट काळ्या रंगाच्या या पक्ष्याला पांढऱ्या रंगाच्या शानदार लांबलचक मिशा असतात. आतल्या बाजूने पंखांचा रंग पांढरा पण पाय आणि चोच लाल रंगाची आणि मिशा आणि चोच याच्या मध्ये पिवळ्या रंगाचा एक भाग असतो त्यामुळे हा पक्षी देखणा दिसतो. या पक्ष्याला त्याचे नाव या भागातील प्राचीन साम्राज्य इंका वरून मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या पक्ष्याच्या मिशा नुसत्या शोभेच्या नाहीत. या मिशा जितक्या लांब तितका पक्षी अधिक सुधृढ असे मानले जाते. हे पक्षी १४ ते २५ वर्षापर्यंत जगतात आणि छोटे मासे हा त्याचा आहार आहे. मात्र या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली असून त्यामुळे त्यांना संरक्षित पक्षी म्हणून घोषित केले गेले आहे.