मधापेक्षाही मधूर जांभळे सफरचंद

रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा असे म्हटले जाते. बाजारात विविध रंगाची सफरचंदे उपलब्ध आहेत. लाल, गुलाबी, हिरवी, पिवळी अश्या अनेक रंगात सफरचंदे मिळतात आणि जगातील २० देशात २०० विविध प्रकारच्या जातीची सफरचंदे पिकविली जातात. पण या साऱ्या जातीत एक दुर्मिळ जात सुद्धा आहे. या जातीच्या सफरचंदाचे नावच मुळी ‘ब्लॅक डायमंड अॅपल असे असून ही सफरचंदे प्रामुख्याने तिबेटच्या पहाडी भागात पिकविली जातात.

या सफरचंदांच्या बागा समुद्र सपाटीपासून साधारण १० हजार फुटांवर आहेत. हे सफरचंद दुर्मिळ मानले जाते. चवीला हे मधापेक्षाही मधुर असते. उंच भागात ही शेती जेथे होते तेथे दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो. दिवसा सूर्यप्रकाशातील अति नील किरणांचा प्रभाव या भागात जास्त असतो व त्यामुळेच या सफरचंदाला गडद जांभळा रंग येतो असे सांगितले जाते. तिबेट भागात ही सफरचंदे ‘दुआ नियु’ या नावाने ओळखली जातात.

ताजी सफरचंदे मेण लावल्यासारखी चमकदार आणि अतिशय आकर्षक दिसतात. तिबेट भागात या सफरचंदाच्या बागा २०१५ पासून लावल्या गेल्या पण अजूनही काही ठरवीक झाडांनाच फळे येत आहेत. या सफरचंदांचा सर्वाधिक खप बीजिंग, शांघाय, शेंजेन येथील सुपरमार्केट मध्ये होतो. एका सफरचंदाची किंमत साधारण ५०० रुपये असते असेही समजते.