देशभरात आजपासून करोना लसीच्या दुसरया टप्प्याचे लसीकरण सुरु झाले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सकाळीच करोना लसीचा पाहिला डोस घेतला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. पंतप्रधानांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या स्वदेशी लसीचा डोस घेतला असून मुळच्या पुड्डुचेरीच्या रहिवासी असलेल्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांना लस दिली. ही लस स्वदेशी असून भारतात तिच्या वापरास मंजुरी दिली गेली आहे. विशेष म्हणजे मोदी यांनी स्वतःच रुग्णालयात जाऊन लस घेतली.
पंतप्रधान मोदींनी घेतला स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस
लस घेतल्यावर मोदी यांनी ट्विटर वरून देशातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे. ट्विट करताना मोदी यांनी लिहिले आहे,’ आमचे डॉक्टर्स, वैज्ञानिक यांनी करोना विरुद्धची लढाई मजबूत करण्यासाठी वेगाने काम केले आहे, आपण लसीकरणासाठी एकत्र येऊया आणि भारताला करोना मुक्त बनवू या.’
पंतप्रधानांनी कोवॅक्सीन लस घेऊन अनेक प्रश्नांना थेट उत्तर दिले असल्याचे मानले जात आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी या लसीच्या वापरास मंजुरी दिल्याबद्दल सरकारला धारेवर धरले होते. या लसीच्या तिसऱ्या फेज मधील चाचण्या न घेताच या लसीला परवानगी दिल्याचा आरोप केला जात होता आणि त्यामुळे या लसीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लावले गेले होते. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानांनी ही लस सर्वात प्रथम घ्यायाला हवी असे मत व्यक्त केले होते. पंतप्रधान मोदींनी स्वतः ही लस घेतल्याने आता या प्रश्नाला उत्तर मिळाले आहेच पण आत्मनिर्भर भारत या मोहिमेलाही बळ मिळाले आहे.