जगात अमेरिकेवर आहे कर्जाचा सर्वात अधिक बोजा

जगाची महासत्ता, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि श्रीमंत देश अशी ओळख असलेल्या अमेरिकेवर जगात सर्वाधिक कर्जाचा बोजा असल्याचे समोर आले असून या कर्जाचे अमेरिकेच्या नागरिकांत समान वाटप केले गेले तर प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ५३ लाख रुपयांचे कर्ज आहे असे म्हणता येईल.

विशेष म्हणजे गेल्या २० वर्षात अमेरिकेच्या कर्जात वेगाने वाढ झाली असून हे कर्ज आता २९ हजार अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. २०२० मध्ये एकूण राष्ट्रीय कर्जभार २३४०० अब्ज डॉलर्सवर होता म्हणजे सरासरी प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ७२३०९ डॉलर्स कर्ज भार आला असता. मात्र हे कर्ज आता अधिक वाढले असून ते २९००० अब्ज डॉलर्सवर गेल्याचे वेस्ट वर्जिनिया येथील खासदार अॅलेक्स मूनी यांचे म्हणणे आहे.

मूनी यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेला चीन, जपानचे प्रत्येकी १ हजार अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे त्याच प्रमाणे ब्राझील २५८ अब्ज, भारत २१६ अब्ज तसेच अनेक अन्य देशांचे कर्ज सुद्धा फेडायचे आहे. २००० मध्ये अमेरिकेवर ५६०० अब्ज डॉलर्सचे कर्ज होते पण ओबामा यांच्या काळात ते दुप्पट झाले असेही मूनी सांगतात. नवीन अध्यक्ष जो बायडेन यांनी जानेवारी मध्ये कोविड प्रोत्साहन पॅकेज पोटी १९०० अब्ज डॉलर्सची घोषणा केल्यावर म्हणूनच त्याला प्रतिनिधी सभेत जोरदार विरोध केला गेल्याचे मूनी सांगतात.