राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची वाढ, तर ५१ रुग्णांचा मृत्यू


मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची दररोज आढळणारी संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. शुक्रवारी राज्यात ८ हजार ३३३ नवे कोरोनाबाधित आढळल्यानंतर, शनिवारीदेखील ८ हजार ६२३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, राज्यात शुक्रवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर शनिवारी मृत्युंची संख्या ५१ आहे. यावरून कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण आपल्या लक्षात येते. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असुन, शनिवारपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याशिवाय शनिवारी दिवसभरात राज्यात ३ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात शनिवारपर्यंत २० लाख २० हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९४.१४ टक्के एवढा झाले आहे.

शनिवारपर्यंत करण्यात आलेल्या तपासण्यात १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ४६ हजार ७७७ (१३.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३४ हजार १०२ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत, तर ३ हजार ८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर, राज्यात शनिवारी एकूण ७२ हजार ५३० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात सीरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन कोरोना लसींच्या वापरास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरात सरकारतर्फे मोफत या लसींचे लसीकरण केले जात आहे. ही लस देशातील वेगवेगळ्या वर्गांना सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोनाची लस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊन ही लस घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचे ठराविक दर देखील सरकारने निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.