राठोड यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचे सूचक ट्विट


मुंबई – पक्ष श्रेष्ठींकडून पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राठोड यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच थेट राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारची पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी नामुष्की झाल्यामुळे शिवसेनेने राठोडांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याच दरम्यान सूचक ट्विट केले आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संजय राऊत यांनी एक ट्विट केले असून यामध्ये संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असे म्हटले आहे. राऊत यांनी सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असे लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केल्यामुळे या ट्विटवरून संजय राऊत यांनी संजय राठोड यांना एकप्रकारचा इशारा दिल्याचे म्हटले जात असून या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.