मन की बात: आतापासूनच आपण पाण्याची बचत सुरु करणे आवश्यक


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी आपल्या रेडिओ प्रोग्राम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी माघ मासापासून थंडी कमी होते, त्यामुळे आपण आतापासूनच पाण्याची बचत सुरु करणे आवश्यक असून नद्यांचे महत्त्व, पाणी वाचवण्याची गरज, आत्मनिर्भर भारत, शेतकऱ्यांचे इनोव्हेशन आणि येणाऱ्या परीक्षांचा विशेष उल्लेख केला.

मोदींनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या पुढील काही महिन्यात परीक्षा सुरु होतील. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना, तुम्हाला एग्झाम वॉरिअर व्हायचे आहे, वरिअर नाही. प्रसन्न मनाने परीक्षा देण्यासाठी जायचे आहे आणि हसतमुख परत यायचे आहे. इतरांची नाही तर तुम्हाला स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. पर्याप्त झोप घेऊन टाइम मॅनेजमेंटसुद्धा करायचे आहे.

पंतप्रधान म्हणले की, शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की ‘माघे निमग्नाः सलिले सुशीते, विमुक्तपापाः त्रिदिवम् प्रयान्ति’ अर्थात माघ महिन्यात कोणत्याही पवित्र जलाशयात स्नान करणे पवित्र मानले जाते. प्रत्येक समाजात नदीशी संबंधित प्रथा आहेत. आपली संस्कृती खूप प्राचीन असून याचा विस्तार जास्त आहे. असा कोणताही समुदाय नाही ज्यामध्ये पाण्याशी संबंधित उत्सव नाही. पाण्याचा स्पर्श जीवन आणि विकासासाठी आवश्यक आहे. माघ मासानंतर हिवाळा समाप्त होतो. आता आपल्याला पाण्याची बचत सुरु करणे आवश्यक आहे.

मे-जून महिन्यात भारताच्या बहुतांश भागात पावसाळा सुरु होतो. आपण आतापासूनच आपल्या जवळपास असलेल्या जलस्रोतांची स्वच्छता, जल संचयन करण्यासाठी 100 दिवसांचे अभियान सुरु करू शकतो का? हाच विचार करून काही दिवसांनी जलशक्ती मंत्रालयाकडून जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ सुरु करण्यात येत आहे. या अभियानाचा मूळमंत्र – ‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’ आहे.