प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव तयार करावे – उद्धव ठाकरे


मुंबई, : मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचे गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचे गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पुस्तकाचे गाव असायला हवे. त्यासाठी पुढील मराठी भाषा गौरव दिनापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठी भाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

विजेत्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज मान्यवरांना देण्यात येणारा हा केवळ पुरस्कार नसून मराठी भाषेची सेवा केल्याबद्दल आणि अक्षरधनाची जपणूक केल्याबद्दल ऋण व्यक्त केले जात आहेत. साहित्यिक केवळ लेखन करत नाहीत. तर ते आयुष्याची गाडी रुळावर ठेवत असतात असा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना प्रमुख म्हणत, एका एका अक्षरातून शब्द बनतो. मग त्या शब्दांचे मंत्रही होतात, ओव्याही होतात आणि शिव्याही होतात. ज्याच्या-त्याच्यावर भाषेचे कोणते संस्कार होतात, त्यातून त्याची भाषा विकसित होत असते. भाषा जपणे म्हणजे संस्कृतीचे जतन करणे आहे, असेही ते म्हणाले.

परदेशातील मराठी मंडळातही मराठी भाषेचे, मातृभूमीचे प्रेम आणि ओढ असल्याचे जाणवते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या उक्तीप्रमाणे ही मंडळी मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी कार्यक्रम, उपक्रमांचेही आयोजन केले जाते. मुख्यमंत्र्यांनी फिलाडेल्फीया येथील अशाच एका कार्यक्रमास उपस्थित राहिल्याची आठवण यावेळी सांगितली.

भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओघवत्या शैलीत आपण वेळ मिळेल, त्यावेळी काही-ना-काही वाचत असतो असे नमूद करतानाच पु.ल. देशपांडे यांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतरीत शब्दांची विसंगती, कवीवर्य वि.दा. करंदीकर यांच्या कविता शालेय जीवनात तोंडपाठ असल्याच्या आठवणी, कवी मंगेश पाडगांवकर यांच्याशी झालेला संवाद, कवी वा.रा. कांत यांची रुग्णालयातील भेट, कवयित्री शांता शेळके यांच्या म्हणी, ओव्या, लोकगीतांविषयीचे साहित्य, बहिणा बाईंची गाणी यांचाही आवर्जून उल्लेख केला. याबरोबरच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाच्या सीडीज यांच्यासह अनेक पुस्तकांचा, विविध साहित्यकृतींच्या सीडीज यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अमुल्य ठेवा दिल्याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.