‘ही’ कंपनी धुम्रपान न करणाऱ्यांना देते आगळावेगळा बोनस

smoker
ऑफिसमध्ये सुट्टी मिळवण्यासाठी आपल्यापैकी कित्येकजण खोटी कारणे सांगतात. मग त्यासाठी काहीजण आजारी असल्याचे सांगतात तर काहीजण खाजगी कारणाच्या नावाखाली कोणत्याही कारणाने ऑफिसला दांडी मारतात. पण सिगरेट न ओढणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जपानमधील एका कंपनी स्वत:हून वर्षाला ६ सुट्ट्या देते. आरोग्यासाठी धुम्रपान धोकादायक असते ते टाळले पाहिजे असे कंपनीचे धोरण असल्यामुळेच कंपनी सिगरेट न ओढणाऱ्यांना हा आगळावेगळा बोनस देते.

धुम्रपान जगभरातील अनेक देशांमधील लाखो लोक करतात. सिगरेट ओढणाऱ्याबरोबरच न ओढणाऱ्यांच्या आरोग्यासाठीही धुम्रपान हे धोकादायक असते. धुम्रपानाबद्दल सर्वच देशांमध्ये जागृती केली जाते. सिगरेटच्या पाकिटांपासून ते टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्रे, समाजमाध्यमांच्या मदतीने धुम्रपान करु नये अशी जनजागृती आपल्याकडेही केली जाते. लोकांना धुम्रपानापासून परावृत्त करण्यासाठी जपानमध्येही सरकारने सिगरेटवरील कर वाढवला.

एवढे सारे प्रयत्न होत असतानाही धुम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. म्हणूनच जपानमधील एका कंपनीने यावर एकदम भन्नाट उपाय शोधून काढला आहे. धुम्रपानविरोधी मोहिम पिआला इंक या कंपनीने अनोख्या पद्धतीने हाती घेतली आहे. सिगरेट ओढणे सोडून योग्य आणि आरोग्यदायी चांगले जीवन कर्मचाऱ्यांनी जगावे असे कंपनीने या मोहिमेबद्दल बोलताना म्हटले आहे. धुम्रपान करणाऱ्यांना रोखण्याऐवजी जे धुम्रपान करत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना सुट्टीमध्ये सवलत देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

कंपनीत काम करणारे जे कर्मचारी सिगरेट ओढत नाहीत त्यांना वर्षाला ६ जास्त सुट्ट्या देण्यात येत आहेत. हा निर्णय घेण्यामागे एक वेगळे कारण असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने नॉनस्कोमकर्सला अधिक सुट्टी देण्याचा हा निर्णय एका कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवर विचार केल्यानंतर घेतला. एका कर्मचाऱ्याने या तक्रारीमध्ये धुम्रपान करणारे कर्मचारी जास्त वेळा ब्रेक घेतात आणि त्यामुळे कामाचा वेळ वाया जातो ही गोष्ट कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. पिआला इंक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही तक्रार गांभीर्याने घेत धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी धुम्रपान न करणाऱ्यांना अधिकच्या सहा सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना लगेच सिगरेट ओढण्याची सवय सोडून दिली. इतर कर्मचारीही तब्बेतीसाठी नाही तरी अधिकच्या सुट्ट्यांसाठी धुम्रपान सोडतील अशी कंपनीला अपेक्षा आहे.

Leave a Comment