राज ठाकरे विनामास्क पोहचले मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात!


मुंबई : अनेकदा विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिसून आले आहेत. ते आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला विनामास्क उपस्थित होते. राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. राज ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.

ते म्हणाले की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथे धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढे जर कोरोनाचे संकट पुन्हा येत असल्याचे दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असे राज ठाकरे म्हणाले. मी मास्क घालतच नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, सरकारच्या मनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे आहे की नाही? याबाबत माहिती नाही. फक्त संभाजीनगरसारखे यांना करायचे आहे. हा दिवस आल्यानंतर सरकारला जाग का येते. त्यांना असे का बोलावसे वाटते. तुम्ही या गोष्टी सरकारला विचारायला हव्या, असे राज ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पहिल्यांदाच स्वाक्षरीची मोहिम होत आहे असे नाही. माझी विनंती आहे की, मराठी बांधवांनी स्वाक्षरी मराठीतून करावी. मी सगळीकडे मराठीतच सही करतो. प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नाही. आपण अशा कृतीतून भूमिका घ्यायला हवी, असे राज ठाकरे म्हणाले.