डासांना दूर ठेवायचेय? अंगावर झेब्र्यासारखे पट्टे ओढा!

Zebra
जंगलातील झेब्र्याच्या अंगावरील काळे-पांढरे पट्टे कीटकांपासून संरक्षण करण्यात मदत करतात. मात्र हे तंत्र मनुष्यांमध्येही उपयोगी ठरते. म्हणून वन्य जमाती अंगावर असे पट्टे ओढतात, असे शास्त्रज्ञांनी एका संशोधनात म्हटले आहे.

आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीमधील आदिवासींच्या अंगावरील रंगांमुळे त्या भागातील रक्तशोषक डासांपासून त्यांना संरक्षण मिळते, असे या संशोधनात म्हटले आहे.

हंगेरीतील इव्होटोस लोरँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका चमूने हे संशोधन केले आहे. त्यांचे संशोधन बुधवारी रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नल या नियतकालिकात प्रकाशित झाले. आपल्या सिद्धांतांच्या पुष्टीसाठी त्यांनी अनेक प्रयोगांची एक मालिकाच राबविली.
या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिकचे पुतळे तयार केले होते. त्यातील काहींची त्वचा काळी, काही गोरे आणि बाकीचे पांढरे पट्टे असलेले गडद तपकिरी होते. या पुतळ्यांवर डिंकाचा थर लावण्यात आला होता आणि त्यांना हंगेरीतील माशांनी भरलेल्या हिरवळीवर चार आठवडे ठेवण्यात आले.

संशोधकांनी प्रयोगाच्या शेवटी या डिंकाला चिकटलेल्या माशा मोजल्या तेव्हा त्यांना अंगावर पट्टे असलेल्या मॉडेलवर सर्वात कमी माशा आढळल्या.

“गडद तपकिरी मानवी शरीराच्या मॉडेलवर पांढरे पट्टे असल्यास माशांच्या दृष्टीने त्यांचे आकर्षण कमी होते,” असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment