सीआरपीएफकडून रजेवर जाणाऱ्या जवानांना करता येणार MI-17 हेलिकॉप्टरचा वापर


नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाली असून मोदी सरकारने या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खास सुविधा काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. सुट्टीवर जात असताना काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांना एमआय-१७ विमानांचा वापर करता येईल.

आयईडीचा वापर काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी करतात. त्यामुळे जवानांना धोका असतो. मोदी सरकारने हा धोका लक्षात घेऊन सीआरपीएफच्या जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या जवानांना सुट्टीवर जायचे असेल, तर त्यांना जवळच्या बेसवर एमआय-१७ हेलिकॉप्टरने सोडण्यात येईल. गुरुवारी हा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.

मॅग्नेटिक आयईडी आणि आरसीआयईडी हल्ल्याचा धोका असल्यामुळे एमआय-१७ हेलिकॉप्टरने रजेवर जात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना जवळच्या बेसवर सोडण्यात येईल. यासाठी आठवड्यातील तीन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. सीआरपीएफने यासंदर्भातील पत्र जवानांसाठी जारी केलं आहे. हेलिकॉप्टरची सुविधा मिळवण्यासाठीची माहिती आणि इतर आवश्यक तपशील यामध्ये देण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे.