चित्रनगरीतील अनधिकृतपणे ताब्यात असलेली उपाहारगृहाची जागा निष्कासित करण्याचे आदेश शहर दिवाणी न्यायालयाकडून कायम


मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी ही चित्रिकरणासाठी एक आदर्श जागा म्हणून चित्रनगरीकडे पाहिले जात आहे. चित्रिकरणात सहभागी होणाऱ्या सर्व घटकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा चित्रनगरीतच उपलब्ध करुन देण्याचा महामंडळाचा सुरुवातीपासूनच कल आहे. या पार्श्वभूमीवर कलाकार/सहकलाकार, सेट उभारणीसाठी येणारे तंत्रज्ञ,मजूर यांना अल्पोपहाराची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महामंडळाच्या परिसरात कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येते.

लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाने सन 1995 मध्ये 1012 चौ.फुट जागा रु.1518 या नाममात्र दराने 5 वर्षासाठी दिली होती. तद्नंतर पूर्वी दिलेल्या जागेत वाढ करुन सन 2001 मध्ये एकूण 1932चौ.फुट एवढी जागा 10 वर्षासाठी करारनाम्याद्वारे भाडेतत्वावर देण्यात आली होती. सदर करारनामा हा द्विपक्षीय सहमतीवर आधारित असून करारनाम्यास मुदतवाढ द्यावयाची झाल्यास ती दोन्हीं पक्षांच्या सहमतीवर अवलंबून राहील अशी स्पष्ट तरतूद करारनाम्यात होती. तथापि, करारातील तरतुदीचे पालन न करता गायकवाड यांनी जागा सोडण्यास करण्यास नकार दिला.

गायकवाड यांच्याकडे असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी महामंडळाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या 03.04.2013 रोजी दिलेल्या आदेशान्वये प्रफुल फास्ट फुड यांना जागेमधून निष्कासित करण्याचे आदेश दिले. सदर आदेशाविरुद्धगायकवाड यांनी सन 2013 मध्ये मा.शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मा. दिवाणी न्यायालयाने गायकवाड यांचा दावा फेटाळून लावत 2 महिन्याच्या आत जागा महामंडळाकडे परत करण्याचा निर्णय दि.15.06.2015 रोजी दिला. या आदेशाविरुद्धहीगायकवाड यांनी मा. उच्च न्यायालयात अपील केले असता मा. उच्च न्यायालयाने 13.08.2015 रोजी श्री गायकवाड यांचे अपिल फेटाळून लावले आहे.

गायकवाड यांच्याबरोबर करण्यात आलेला करारनाम्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही गायकवाड यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दि.01.05.2017 ते 30.04.2018 या कालावधीसाठी करार करण्यात आला होता. सदर कालावधी समाप्त झाल्यानंतरही गायकवाड हे जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाने सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई यांचे न्यायालयात केलेल्या अर्जात सक्षम प्राधिकारी यांनी 14.01.2021 रोजी निष्कासनाचे आदेश पारित केले असून 1 महिन्याच्या आत जागा खाली करण्याचे व थकबाकीची रक्कम भरण्याचे निर्देश दिले आहेत 1 महिन्याचा कालावधी समाप्त झाला असून सक्षम प्राधिकरणामार्फत निष्कासनाची कार्यवाही 01.03.2021 रोजी करण्यात येणार आहे.

दरम्यान गायकवाड यांनी पुन्हा सक्षम प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली असून सदर याचिकेवर आज दि.26.02.2021 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान गायकवाड यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील तसेच मुखत्यार पत्रधारक प्रफुल लक्ष्मण गायकवाड यांनी 4 आठवड्यांच्या आत जागा सोडण्याचे करण्याचे मान्य केले आहे. मा. न्यायालयाने य बाबत प्रतिज्ञापत्र (Undertaking) देण्याचे निर्देश दिले आहेत. थोडक्यात मा. शहर दिवाणी न्यायालयाने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले निष्कासनाबाबतचे आदेश कायम ठेवले आहे असे असतानाही गायकवाड यांनी चित्रनगरीतील त्यांच्या अनधिकृतपणे ताब्यात असलेल्या उपाहारगृहामध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले असून मला प्रतिकार केल्यास माझ्याजवळ गॅससिलेंडर असून त्याचा वापर करुन पेटवून घेण्याची धमकी सुरक्षा व्यवस्थेस दिली असून घोषणाबाजी करीत आहे.

मा. न्यायालयासमोर गायकवाड यांनी मान्य केलेली स्थिती व उपरोक्त कृती ह्या परस्पर विसंगत असून त्यांच्या कृतीतून प्रसार माध्यमे व राजकीय क्षेत्रातून दबाव निर्माण करण्याचा तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महामंडळाच्या स्तरावरुन अत्यंत पारदर्शक पद्धतीने Food court / Canteen साठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सदर निविदा प्रक्रियेत भाग न घेता एक साहित्यिक या प्रतिमेचा गैरवापर करुन काही काळासाठी दिलेली जागा कायमस्वरुपी मिळविण्याचा गायकवाड यांचा मानस असल्याचे स्पष्ट होत असून त्यासाठी त्यांनी दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणी प्राप्त झालेल्या न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यासही त्यांची तयारी नाही, ही बाब त्यांना एक साहित्यिक म्हणून निश्चितच शोभनीय ठरत नाही.